सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो उठाव केला होता. त्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे व अपशब्द वापरुन खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. कामाख्यादेवीच्या प्रथेबद्दल अनुदगार काढले गेले परंतु त्याच कामाख्यादेवीच्या आशिर्वादाने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्हाला भगवा मिळाला आहे. याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.
शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आमच्या उठावाची कारणे वेगळी होती. वारंवार सांगूनही पक्ष नेतृत्वाने ती कधीही समजून घेतलीच नाहीत. आमचे राजकीय अस्तित्वाला आव्हान दिले जात होते. पर्यायाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्ष संपण्याच्या मार्गावर चालला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम केले आहे. कायदा व बहुमत दोन्ही आमच्या बाजूने होते. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री होती.
मुळात तो उठाव नव्हता तर बाळासाहेबांची शिवसेना एकवटली होती. जी उरली होती ती शिल्लक सेना होती. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजहिताचा व विकासाचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. परंतु आमच्याच काही जुन्या सहकाऱ्यांकडून कधी भावनेचा आधार घेऊन तर कधी अत्यत खालच्या पातळीवर टीका करून राजकारण केले गेले. शक्तीपीठा पैकी एक असलेल्या कामाख्यादेवीचा अनादर केला गेला. आमदारांच्याबाबतीत तर त्यांची प्रेते माघारी येतील अशा धमक्या देण्यात आल्या. महिला आमदारांबद्दल अनुदगार काढले गेले, हे सर्व निंदनीय होते. जनता तटस्थपणे प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करत असते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात आमच्या भूमिकेचे स्वागत झाले. प्रत्यक्ष सामान्य मतदाराच्या भावना ज्या निवडणुकीतून कळतात त्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला ऐतिहासिक यश मिळाले. आता तर आमच्या हक्काचे चिन्ह, हक्काचा पक्ष व हक्काचा भगवा जनतेच्या आशिर्वादाने आणि कामाख्यादेवीच्या कृपाआशिर्वादाने मिळाला आहे. आजच्या निकालामुळे आम्हाला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा हा विकासाचा झंझावात आता खऱ्या अर्थाने पुढे जाईल, असा मला शंभर टक्के विश्वास आहे.