राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे हे पकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनाला गैरहजर आहेत. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (१७ जुलै) सुरू झालं आहे. परंतु रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदार तुपे यांना अधिवेशनाला हजेरी लावता आली नाही, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. चेतन तुपे यांनी ट्विटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करून आपल्या गैरहजेरीचं कारण स्पष्ट केलं आहे.
या व्हिडीओमध्ये आमदार चेतन तुपे यांनी म्हटलं आहे की, नोबेल रुग्णालयातून माझा तुमच्याशी संवाद होत आहे. राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. परंतु माझी प्रकृती बरी नसल्याने मी गेले काही दिवस रुग्णालयात उपचार घेत आहे. अजूनही काही दिवस उपचार घ्यावे लागतील, तसेच विश्रांती घ्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मला फक्त एकच उणीव जाणवतेय, ती म्हणजे, अधिवेशानाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज मी मिस करणार आहे.
आमदार चेतन तुपे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशनाला सतत हजर होतो. अधिवेशनात आतापर्यंत मी मतदारसंघातील, हडपसरचे, तिथल्या सगळ्या भागांचे प्रश्न मांडले आहेत. पुणे शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याला मी प्राधान्य दिलं. जनहिताचे प्रश्न खूप तळमळीने मांडले, प्रसंगी आवाज उठवला. महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्यात मी यशस्वी झालो. विधानसभेतील भाषणे असोत, प्रश्नोत्तरे असोत, अथवा इतर काही, सगळ्या माध्यमातून मी कार्यरत राहिलो आहे. परंतु यावेळी मात्र प्रकृतीमुळे मी पहिल्या दिवशी तिकडे जाऊ शकत नाही. याची मला निश्चितच खंत वाटतेय.
हे ही वाचा >> VIDEO : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून थोरात-फडणवीस आमने-सामने, नेमकं काय घडलं…
आमदार चेतन तुपे म्हणाले, विधानसभेच्या त्या पायऱ्यांवरची आंदोलनं, घोषणाबाजी, नवीन कल्पकतेनं केलेली आंदोलनं, लोकांचे प्रश्नं मांडणं, हे सगळं मला आठवतंय. अधिवेशन मी मिस करतोय. असं असलं तरी पुढील काही दिवसात औषधोपचार घेऊन लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मी विधीमंडळात उपस्थित राहीन. लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.