कराड: राज्यातील भाजप जिल्हाध्यक्ष निवडीची यादी पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी जाहीर केली. त्यात इच्छुकांच्या यादीत नसलेले ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांची सातारा भाजप जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. मुळचे काँग्रेस विचाराचे असलेले डॉ. भोसले आजमितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेते, मंत्र्यांच्या मर्जीतील मानले जातात.
खरेतर, जिल्हाध्यक्षपदासाठी मावळते जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हेही इच्छुक होते. खासदार उदयनराजे यांचे निकटवर्तीय सुनील काटकर, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय जयकुमार शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु, ही माळ डॉ. भोसले यांच्या गळ्यात पडली.
डॉ. भोसले हे पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारीऐवजी चांगल्या खात्याच्या मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण, ‘निवडून आले आणि मंत्री झाले’ असे भाजपचे धोरण नसल्याने डॉ. भोसले प्रतीक्षेत राहिले होते. अतुल भोसले हे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जयवंतराव भोसले यांचे नातू आणि काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे जावई आहेत.
भोसले गटाकडे आज कराड दक्षिणच्या आमदारकीसह कृष्णा साखर कारखाना, कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा बँक यासह शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक संस्था असे वलय आहे. अशातच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसला कधी पराभव माहिती नसलेल्या ‘कराड दक्षिण’मधून अतुल भोसले यांनी मोठा विजय मिळवला आहे.
राजे मंडळींशीही त्यांचा चांगला स्नेह असल्याने हे सर्व विचाराधीन घेऊन आमदार भोसले यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीचे भाजप व भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.सातारा जिल्हा हा सुरुवातीपासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला होता. परंतु, गेल्या दशकभरात पूर्ण चित्र पालटले असून, जिल्ह्यात भाजप बलाढ्य पक्ष बनला आहे. प्रमुख सर्व सत्तास्थाने ‘महायुती’कडे आहेत. ही भक्कमस्थिती कायम ठेवण्याची प्रमुख जबाबदारी आता डॉ. अतुल भोसले यांच्याकडे आली आहे.