सोलापूर : करमाळा तालुक्यात गाजलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या संजीवनी पॅनेलने सर्व २१ जागा जिंकून कारखान्यावर ताबा मिळविला आहे. तर, प्रतिस्पर्धी माजी आमदार संजय शिंदे यांना विधानसभेनंतर पुन्हा आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.

अनेक वर्षांपासून नेहमीच रडत, रखडत वाटचाल करणाऱ्या आणि मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व २१ जागांसाठी ६०.७९ टक्के मतदान झाले होते. शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली असता पहिल्या टप्प्यापासूनच आमदार नारायण पाटील यांच्या संजीवनी पॅनलने मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत स्वतः आमदार नारायण पाटील हे निवडून आले. त्यांना आव्हान दिलेले माजी आमदार संजय शिंदे यांच्या आदिनाथ बचाव पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. माजी आमदार संजय शिंदे यांचा स्वतः केम गटात मानहानीकारक पराभव झाला.

या निवडणुकीत संजीवनी पॅनलकडून जेऊर गटात दत्तात्रय गव्हाणे, महादेव पोरे व श्रीमान चौधरी हे विजयी झाले. तर केम गटातून दत्तात्रय देशमुख, विजय नवले आणि महेंद्र दिनकर पाटील यांचा विजय झाला. पोमलवाडी गटातून किरण कवडे, नवनाथ झोप आणि संतोष पाटील यांनी बाजी मारली. सालसे गटातून रविकिरण फुके, आबासाहेब खंडारे व दशरथ हजारे हे निवडून आले. सर्व जागा जिंकताना आमदार नारायण पाटील गटाने माजी आमदार संजय शिंदे गटावर दोन हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळविले आहे.

या निवडणुकीत संजय शिंदे यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी ताकद पणाला लावली होती. तर त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपचे नेते, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आमदार नारायण पाटील व मोहिते-पाटील गटाला पाठिंबा दिला होता. या कारखान्याचे कार्यक्षेत्र आमदार रोहित पवार आणि प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्यातही आहे. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह माजी आमदार जयवंत जगताप आदींनी सक्रिय समर्थन दिले होते. निवडणुकीपासून दूर राहिलेल्या बागल गटाने शेवटच्या क्षणी आमदार नारायण पाटील यांच्या बाजूने यंत्रणा उभी केली होती. यात माजी आमदार संजय शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांना सोबत घेऊन दिलेले आव्हान कुचकामी ठरले.