MLA Narendra Mehta on MNS Protest in Mira Bhayandar : “मीरा भायंदर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनसे व मराठी एकीकरण समितीच्या मोर्चावर पोलिसांनी कारवाई केली असेल”, असं वक्तव्य मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलं आहे. मीरा-भाईंदर शहरात चालू असलेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला जाणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. तसेच मोर्चासाठी जमलेल्या महाराष्ट्र सैनिकांना व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरांत परप्रांतीयांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला आमदार नरेंद्र मेहता यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मराठी मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. यावरून त्यांना प्रश्न विचारल्यानंतर मेहता म्हणाले, “अमराठी लोकांच्या मोर्चाचा हेतू वाईट नव्हता. मात्र, मनसेच्या मोर्चाच्या मागे काही इतर राजकीय लोक असल्याची शंका आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही.”

मराठी माणसाबरोबर दुजाभाव का? नरेंद्र मेहता म्हणाले…

मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांना मोर्चा काढायला परवानगी दिली, परंतु मराठी माणसाला परवानगी दिली नाही, असा दुजाभाव का केला जातोय? असा प्रश्न विचारल्यावर मेहता म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे परप्रातींयांच्या मोर्चाला देखील परवानगी दिली नव्हती. परंतु, त्यांचा हेतू एकच आणि स्पष्ट होता. ‘आमच्या लोकांना मारलं आहे, असं भविष्यात घडू नये, त्यावर कडक कारवाई व्हावी’. एवढीच त्यांची भूमिका होती. तसेच ते लोक एका सभागृहात संघटित झाले होते. कोणी असभ्यता दाखवली नाही. मात्र, यांची (मराठी एकीकरण समिती व मनसे) भूमिका वेगळी आहे. दाखवायचं एक आणि करायचं एक अशी भूमिका दिसतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उत्तरावर मेहता यांना विचारण्यात आलं की तुम्ही मराठी लोकांवर संशय घेताय का? आंदोलन चालवणारे कोण? असे प्रश्न परप्रांतीयांच्या आंदोलनावेळी का उपस्थित केले नाहीत? त्यावर मेहता म्हणाले, “मोर्चा कोणीही काढावा. परंतु, ते आंदोलन चालवणारा वेगळा असेल तर पोलिसांना दखल द्यावी लागते. मी फक्त माझं मत सांगतोय. मनसेच्या आंदोलनाचा मार्ग देखील संशयास्पद होता. त्यामुळे काही धोका निर्माण होईल असं पोलिसांना वाटलं असेल. ते भाजपा कार्यालयावरही मोर्चा काढणार होते. भाजपा कार्यकर्ते व ते लोक समोरासमोर आले असते तर काय झालं असतं? त्यांनी सरकारी कार्यालयावर मोर्चा काढायला हवा होता.”