विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यावरून सध्या दोन मतप्रवाह असून, राज्य सरकारनं परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. राज्यातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र, यूजीसीनं परीक्षा घेण्यासंदर्भात नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट यूजीसीकडेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही राज्यातील परिस्थिती दिलासादायक नाही. करोनाचा प्रसार झपाट्यानं होत असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची विनंती यूजीसीकडे करण्यात आली आहे. दरम्यान, याच विषयावर रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत. “करोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोजी आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा”, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर यूजीसीनं परीक्षा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यासंबंधात नवीन मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका वारंवार जाहीर केली जात असून, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयालाही पत्र पाठवलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla rohit pawar appeal to ugc for cancel university exam bmh
First published on: 17-07-2020 at 13:32 IST