अहिल्यानगर: शहर स्वच्छतेसाठी महापालिकेमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेतली. तसेच प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनाही धारेवर धरत शहरातील स्वच्छतेबाबत जाब विचारला. जबाबदारी टाळणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
यावेळी आयुक्त डांगे यांच्यासह उपायुक्त संतोष इंगळे, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे व श्रीकांत निंबाळकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने आपल्या विभागातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना द्याव्यात. नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, अशीही सूचना आमदार जगताप यांनी केली. स्वच्छता निरीक्षक जबाबदारीने पार पाडत नसतील तर मी स्वतः त्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार करेल, असा इशाराही जगताप यांनी दिला.
स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, कचरा फक्त कचरा गाडीतच टाकावा, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे, असेही त्यांनी सांगितले.
आयुक्त डांगे म्हणाले, शहरात स्वच्छतेसाठी मनपा प्रयत्नशील आहे. यासाठी नव्याने कचरा संकलन करणारी ठेकेदार कंपनी नियुक्त केली आहे. मनपा कर्मचारीही रोज सकाळी स्वच्छता करतात. मात्र, स्वच्छता झाल्यावर नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. अशा नागरिकांवर मनपा कर्मचारी लक्ष ठेवतील. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना मनपा ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करेल. भिस्तबाग परिसरात अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.
स्वच्छता निरीक्षक जबाबदारीने पार पाडत नसतील तर मी स्वतः त्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार करेल, असा इशाराही जगताप यांनी दिला. स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, कचरा फक्त कचरा गाडीतच टाकावा, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी स्वच्छता मोहीम
शहरात शुक्रवारी सकाळी आयुर्वेद महाविद्यालय चौक ते माळीवाडा वेस- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच पत्रकार चौकातील भगतसिंह उद्यान या भागांमध्ये ‘डीप क्लीन स्वच्छता अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष इंगळे यांनी दिली.
