सांगली : कोणाला राजकारणातून बाजूला करायचे म्हणून नाही तर विटा शहराचा विकास साधायचा या हेतूनेच राजकारण करत आहे. विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य लक्षात घेऊन जर विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्याचा जरूर विचार केला जाईल, असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार बैठकीत केले.
विटा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार बैठकीत बोलताना आमदार बाबर म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी विट्यातील जनतेने मताधिक्य आम्हाला दिले. लोकप्रतिनिधी या नात्याने मी विकासकामांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न तर करत राहीनच, पण विटा शहरातील नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही याचीही दक्षता घेत आहे. नव्याने करण्यात आलेली कर आकारणी १५ ते २०० टक्के वाढ होती. याबाबत नोटिसा हाती मिळताच तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून वाढीव करवाढीला स्थगिती मिळवली. तसेच विटा शहरातील विविध रस्त्यासाठी १२५ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ९० कोटी रुपये खर्चाच्या नवीन नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. जनतेच्या प्रत्येक सुख-दु:खात आपण सहभागी राहिलो आहे, यापुढेही सोबत राहीन.
विटा नगराध्यक्षपद ओबीसी महिला असल्याने पाटील अथवा बाबर कुटुंबातील कोणीही महिला या पदाची दावेदार असणार नाही. सामान्य महिलेला ही संधी घटनेने दिली आहे. येत्या निवडणुकीसाठी आमचे २७ उमेदवार निश्चित झाले असून त्यांना विटेकर जनता विधानसभा निवडणुकीप्रमाणेच साथ देतील यात शंका वाटत नाही. कोणाचे घर अथवा कोणाला तरी राजकारणातून बाजूला करायचे म्हणून आम्ही राजकारण करत नाही, तर सत्तेच्या माध्यमातून शहराचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आपण सक्रिय राहू असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अमर शितोळे, कृष्णात गायकवाड, विटा मर्चटस बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष उत्तम चोथे, सुनील मेटकरी, भालचंद्र कांबळे, श्रीधर जाधव, राजू तोडकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही हालचाली गतिमान केल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवार निश्चित करण्यासाठी गुप्त बैठकांचा धडाका लावला आहे.
