बीड : भाजपकडून उमेदवारी मिळेपर्यंतच्या काळात खूप अवमान सहन केला. विजयानंतर गोपीनाथगडावरून थेट भूषणगडावर येऊन पहिला सत्कार स्वीकारला, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची ‘सद्भावना’ होती. मी काही ‘पॅराशुट’ नेता नाही तर ‘ग्रासरुट’ चा असल्याने चार वेळा निवडून आलो आहे. तुम्ही गृहमंत्री होणार असल्याचे सांगता पण अगोदर निवडून यायचा पत्ता आहे का, अशा शब्दात आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. शिरूर येथे जाहीर सत्काराच्या निमित्ताने रविवारी धस-क्षीरसागरांनी हातात हात घालून राजकीय संदेश दिला.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार नगर पंचायतीत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सहा महिन्यांतच परिवर्तन करून आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. गल्ली ते दिल्ली पर्यंत न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या पाश्र्वभूमीवर रविवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी शिरूरमध्ये आमदार धस आणि बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा एकत्रित सत्कार झाला. या वेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरुवातीलाच सुरेश धस हे राजकारणात काम करणारा ‘भूत माणूस’ असल्याने ते केव्हा काय करतील, याचा थांगपत्ता लागत नाही. सर्वसामान्यांच्या कामासाठी ते कारकुनापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पाठपुरावा करतात, असे सांगितले. राष्ट्रवादीचा ‘विराट कोहली’ अशी त्यांची ओळख होती. मात्र, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार धस यांना आपल्याकडे घेतल्याने आमच्या पक्षाची अवस्था बिकट झाल्याचे डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय कौशल्याचेही कौतुक केले.

आमदार सुरेश धस यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत भाषण करत मनातील वेदनाही व्यक्त केल्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषदेत मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी मिळेपर्यंत खूप अवमान सहन केला. विरोधी पक्षाबरोबर जवळचेही लोक धस यांना भाजपात कोणी विचारत नसल्याच्या टिपण्या केल्या. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा ‘पॅराशुट’ नेते असा उल्लेख करत नगरपंचायतीत माझे सदस्य फोडून त्यांनी हस्तक्षेप केला. आपण वयाच्या २९ व्या वर्षी आमदार होऊन आजपर्यंत चार वेळा निवडून आलो आहोत. तुम्ही एकदा तरी लोकातून निवडून आलात का, असा सवालही धनंजय मुंडे यांना केला. जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर-धस यांनी हातात हात घालून विकासासाठी एकत्र आल्याचे सांगत असले, तरी राजकीय पातळीवर योग्य तो संदेश दिल्याचे दिसून आले.