मिरज शहरातील विविध विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी परत गेल्याने आमदार सुरेश खाडे यांनी महापालिकेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मिरजेतील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश आ. खाडे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत आमदार खाडे यांनी विकासकामांबाबत प्रशासनाला धारेवर धरत कामे का रखडतात, असा सवाल केला.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मंजूर झालेला काही विकासनिधी परत गेल्याने संतप्त झालेल्या आ. खाडे यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तर एलईडी दिव्याचा ठेका घेतलेल्या समुद्रा कंपनीकडून योग्य सेवा दिली जात नसल्याने आ. खाडे यांनी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. कंपनीच्या कामाची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आणि कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश मनपा प्रशासनाला दिला.

मिरजेतील बहुचर्चित व प्रलंबित भाजी मंडई बांधकामासाठी राज्य शासनाकडून तब्बल १३ कोटी रुपये निधी देऊनसुद्धा सहा वर्षांत हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, याबाबत तातडीने कार्यवाही करून येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व दोन महिन्यांत मंडईच्या पहिल्या इमारतीचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या इमारतीचे काम सुरू झाले पाहिजे, असा आदेश आ. खाडे यांनी या वेळी दिला. त्याचबरोबर निधी देऊनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

तसेच वखार भागातील मलनिस्सारणाची कामे रखडली आहेत, त्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. चार महिन्यांत कामे पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी या वेळी दिली. भटक्या श्वानांना पकडण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी, त्याचा रोजचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात यावा, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी चार सिग्नल येत्या दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या व्यतिरिक्त मिरज कृष्णा घाट येथील हिंदू स्मशानभूमीतील डिझेल दाहिनीची देखभाल, शहरातील अरुंद गल्ली-बोळ लक्षात घेऊन मिरज शहरासाठी लहान आकाराची नवीन शववाहिका मंजूर करणे, बालगंधर्व नाट्यगृहाची योग्य देखभाल करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, माजी स्थायी सभापती सुरेश आवटी, पांडुरंग कोरे, माजी महापौर संगीता खोत, गणेश माळी, निरंजन आवटी, संदीप आवटी, मोहन वाटवे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.