मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषणाच्या १७ व्या दिवशी आपलं उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली असून उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत फळांचा ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. या प्रकरणी आता राज ठाकरेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच महाराष्ट्र सरकारला टोलाही लगावला आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माईकप्रकरणावरुन सरकारला टोला

असं म्हणत राज ठाकरेंनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटच्या शेवटच्या दोन ओळी दोन दिवसांपूर्वी व्हारयल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते आपण बोलून मोकळं व्हायचं. त्यावेळी माईक सुरु आहे अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली होती. त्यावरून राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.