देशात जेव्हा एखाद्या पक्षाला एकहाती सत्ता मिळते तेव्हा ते पक्ष स्वत:ला सांभाळू शकलेले नाहीत. इंदिरा गांधी, व्ही पी सिंग, मोरारजी देसाई यांचे उदाहरण सर्वांसमोर आहे. मोदी सरकारलाही विरोधकांची गरज नसून ते स्वतःच्या चुकांनी खड्ड्यात जाणार, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. गुजरातच्या निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्ष प्रबळ होतील, याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या ‘मंथन’ या कार्यक्रमात गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते. नोटाबंदी, बुलेट ट्रेन, गुजरात निवडणूक, सोशल मीडियाचा वापर अशा विविध मुद्द्यांवरुन त्यांनी भाजपवर घणाघात केला. गुजरातमध्ये विकास झालेला भागच मला दाखवला गेला. अविकसित गुजरात मला दाखवलाच नाही. हा भाग आता समोर येत आहे, असे त्यांनी सांगितले. राजकारणातील २५ वर्षांच्या काळात एवढी भाषणं देणारे आणि निवडणुकांच्या प्रचारात इतके सक्रीय असणारे पंतप्रधान मी पहिल्यांदाच बघितले, असा चिमटाही त्यांनी काढला. दाखवण्यासारखे आणि सांगण्यासारखे काही उरले नाही, म्हणून ताजमहालसारखे मुद्दे समोर येतात, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला हे मला अजूनही समजत नाही. आधी तुम्ही इंजिन बंद केले आणि आता तुम्ही धक्का मारायला सांगत आहात. फक्त ४०० कोटी रुपयांसाठी तुम्ही नोटाबंदी केली का? असा सवाल त्यांनी विचारला. सर्वसामान्य जनतकडे पैसे नाही, पण भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष झाला, असा चिमटाही त्यांनी काढला.

जगभरात मंदी होती, त्यावेळी मनमोहन सिंग यांनी देशाला सावरले होते. मोदी सरकारला काळा पैसा बाहेर काढायचा होता तर त्यांच्याकडे वेगळे पर्यायदेखील होते. सध्या देशाची उर्जा अर्थव्यवस्थेला सावरण्यात खर्ची पडत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

भाजपने २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दाऊदला भारतात परत आणून निवडणुकीत विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जर दाऊदच्या घरवापसीत अपयश आले तर दंगल किंवा कारगिलसारखे युद्ध करुन निवडणुकीत बाजी मारण्याचा भाजपचा डाव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

मी गुजरातीविरोधी नाही. पण बुलेट ट्रेनवर जे लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत, त्या पैशांमधून देशातील रेल्वेत सुधारणा करता येईल, असे सांगतानाच मुंबईत बुलेट ट्रेनची एक विटही रचू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray hits out at narendra modi bjp over noteban gujarat election dawood ibrahim
First published on: 26-10-2017 at 12:27 IST