रायगडासह महाराष्ट्रभरात ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी जागोजागी मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र जमताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराजांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राची चर्चा होऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या ट्वीटमध्ये याच मुद्द्याला धरून भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

राज ठाकरेंनी यासंदर्भात एक सविस्तर ट्वीट केलं असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या भवितव्याविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. “३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्नसुद्धा ह्या देशात जेव्हा पडत नव्हतं तेव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो”, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

“…अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल”

“मी आणि माझे सहकारी सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल”, असं राज ठाकरे म्हणाले.

रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह; राजकीय दिग्गजांची हजेरी!

“बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते. हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार?”, असंही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोस्टच्या शेवटी राज ठाकरेंनी तमाम जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.