Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईतील वांद्रेमधील रंगशारदा सभागृहात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मत चोरीबाबतचे सादरीकरणही केले. या सादरीकरणानंतर १ नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाची तयारी करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
किल्ल्यांवर पंतप्रधान मोदींच्या नावाने पर्यटन केंद्र
राज ठाकरे यांनी आजच्या वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातमीचा संदर्भ दिला. एकनाथ शिंदेंच्या खात्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे या वृत्तात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. याचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकार शिवनेरी, रायगड, राजगडावर नमो केंद्र स्थापन करणार आहे. जिथे फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे. तिथे हे आता पर्यटन केंद्र उभारणार आहेत. मी आताच सांगतो. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. वर नाही किंवा खाली, आजूबाजूला कुठेही सत्ता नसो. पण हे पर्यटन केंद्र उभे केले की, फोडून काढणार.
मुख्यमंत्री पदासाठी लाचारी…
स्वतःला मुख्यमंत्री पद हवे म्हणून किती लाचारी करणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. “खाली काय चाटूगिरी चालू आहे, हे वर पंतप्रधान मोदींनाही माहीतही नसणार. सत्ता डोक्यात गेल्यामुळे आपण वाटेल ते करू, हा विचार येतो. मला मुख्यमंत्री केले पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मिळेल, ते मिळाले पाहिजे. यासाठी समोरच्याला खूश करण्यासाठी जे जे लागेल, ते दिले पाहिजे, ही यांची भूमिका आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले, सत्तेसाठी हे लोक काहीही करत आहेत आणि सत्ता येते ईव्हीएम मशीनमधून. त्यामुळे १ नोव्हेंबरचा मोर्चा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावे.
