फेरीवाल्यांची मस्ती उतरवण्याचा इशारा दिल्यानंतर आज राज ठाकरे ठाण्यात; घेणार कल्पिता पिंपळेंची भेट

कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त असणाऱ्या कल्पिता पिंपळेवर फेरीवाल्याने केलेल्या हल्यात त्यांची तीन बोटं तुटली

Raj thackeray
कालच राज ठाकरेंनी यासंदर्भात इशारा दिला होता. (फाइल फोटो)

महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली. असं असतानाच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्पिता पिंपळे यांची भेट घेणार आहेत. आज राज ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर असून ते कल्पिता यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे. याचसंदर्भात काल राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या फेरीवाल्याला मनसे सोडणार नाही असा इशारा दिला. “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील,” असं राज म्हणाले आहेत.

नक्की काय घडलं?

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.

…अटक आणि गुन्हा

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पुन्हा कारवाई करणार…

साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली.  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns chief raj thackeray to meet tmc municipal co commissioner kalpita pingle who was attacked by hawker scsg

ताज्या बातम्या