शिवसेनेत झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. या मुलाखतीवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून ही मुलाखत म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा टोला मनसेनं लगावला आहे.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपावर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडेंनी ट्विटरवरुन दोन ट्वीट करत मुलाखतीवरुन शिवसेनेला लक्ष्य केलंय.

अनेक वृत्तवाहिन्यांवर सकाळी साडेआठ वाजता दाखवण्यात आलेली ३६ मिनिटांची मुलाखत संपल्यानंतर पाच मिनिटांच्या आताच संदीप देशपांडेंनी ट्विटरवरुन मुलाखत या हॅशटॅगसहीत एक पोस्ट केलीय. “अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे सिंपथी” असं देशपांडे यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

कालच राऊत यांनी या मुलाखतीचा टीझर पोस्ट केला होता. आज सकाळी ‘सामना’मध्ये ही मुलाखत छापून आल्यानंतर सहा वाजून ५० मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये देशपांडे यांनी “‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले” असं म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संदर्भ देत टोला लगावला. या ट्विटमध्ये शेअर केलेल्या व्यंगचित्रात संजय राऊत यांनी एका हातात घड्याळ पकडलं असून ते त्यांनी पाठीमागे लपवल्याचं दाखवण्यात आलंय.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

कॅप्शनमध्ये ‘साहेब’ शब्दाला कोट करण्यात आल्याने हे विधान पवारांच्या संदर्भातून असल्याचं स्पष्ट होतंय. शेअर केलेल्या व्यंगचित्रामध्ये खणखणीत मुलाखत असा मजकूर लिहिला असून संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या हातात एक कागद देताना दिसत आहे. राऊत हे, “हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न व उत्तरे” असं म्हणताना दाखवण्यात आलेत. तर उद्धव हा कागद हातात घेताना, “बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरे,” असं म्हणताना दाखवले आहेत.

नक्की वाचा >> “शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा डाव आहे”; फडणवीसांसंदर्भातील त्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा आरोप

उद्धव ठाकरेंची ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रकाशित होणार असून आज पहिला भाग प्रकाशित झाला आहे तर उद्या म्हणजेच २७ जुलै रोजी दुसरा भाग प्रकाशित होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns first reaction on uddhav thackeray interview with sanjay raut give sharad pawar connection scsg
First published on: 26-07-2022 at 10:58 IST