पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.त्याच दरम्यान महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली.त्या सर्व घडामोडी दरम्यान महिला आयोगा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले (०२२-२६५९२७०७/२६५९०७३९/१५५२०९) हे दोन टोल फ्री नंबर बंद असल्याचेसमोर आले आहे.हे प्रकरण मनसेचे जनहित कक्ष विधी विभागाचे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी समोर आणले असून हे नंबर लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.तर या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क केला असता,तो होऊ शकला नाही.
यावेळी नरेंद्र तांबोळी म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाकडे दिनांक २६ मे रोजी महिला अत्याचाराची तक्रार घेऊन पीडित महिलेचे नातेवाईक आले होते.या संदर्भात आम्ही महिला आयोगा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या नंबरवर फोन लावला. त्या नंबरवर काही फोन लागला नाही.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनी मोठा गाजावाजा करीत टोल फ्री नंबर १५५२०९ याची घोषणा केली होती.तसेच ०२२-२६५९२७०७ / २६५९०७३९ या नंबर वर देखील फोन केला होता.परंतु आज तो नंबर बंद असल्याने राज्यातील अत्याचारीत महिलांना उपयोग होत नसल्याची धक्कादायक परिस्थितीची माहिती समोर येत आहे.
यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही महिलेस कौटुंबीक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैगिक किंवा मानसीक त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड अशा कोणत्याही घटनेत अन्यायग्रस्त महिलांना तक्रार नेमकी कुठ करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा फोन लावला असता तो पण बंद असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे शासनाच्या या असंवेदनशील वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभाग निषेध करीत आहे.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अत्याचारीत महिलांना न्याय देण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाच्या वतीने मोफत कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. दर शुक्रवारी दुपारी ४ ते ६ यावेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय नवी पेठ पुणे येथे अत्याचारित महिलांनी पुढील व्हाट्सअॅप क्रमांकावर संपर्क (९३२६७८७७७८) साधण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा बंद असलेला टोल फ्री आणि कार्यालयाचा नंबर लवकरात लवकर सुरू करण्यात यावा,या मागणीचे पत्राद्वारे मागणी करीत आहोत,तसेच तरुणी आणि महिला वरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावल उचलावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.