महाराष्ट्रातील शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे, हा राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम असून सुपारी गँग नसती तर राज्यात महाविकास आघाडीच्या ३८ जागा निवडून आल्या असत्या, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे ‘सिल्वर ओक’चे सुपारीबाज नेते आहेत, असे ते म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…”

नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?

“संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती. ते त्यांनी करून दाखवलं. त्यांनी शिवेसेनेचे दोन तुकडे करू दाखवले”, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. “संजय राऊत हे दुसऱ्यांवर सुपारी घेण्याचे आरोप करतात, मात्र, त्यांनी पत्राचाळीची सुपारी घेतली होती. ते शरद पवारांच्या सिल्वर ओकवर दलाली करतात, ते सिल्वर ओकचे सुपारीबाज नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या टीकेवर लक्ष देण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

“संजय राऊत हे १५ वर्षांपासून खासदार आहे. मात्र, खासदार निधीतून त्यांनी एकदाही जनतेची कामे केली नाही. संजय राऊतांनी बोलू नये, उगाच आम्हाला तोड उघडायला लावू नये, ते दिल्लीच्या कोणत्या हॉटेलमध्ये बसून काय धंदे करतात, हे आम्हाला संभाजीनगरमध्ये बसून कळतं, त्यामुळे संजय राऊतांनी उगाच राज ठाकरेंवर आरोप करू नये, अन्यथा यापुढे त्यांच्या घरासमोर येऊन उत्तर देईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – “RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, संजय राऊतांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना मनसेवर टीका केली होती. “मराठी मतदारांसह इतर धर्मियांनी शिवसेनेला मतदान केल्याने मनसेच्या पोटात दुखत आहे. खरं तर सुपारी गँग नसती तर लोकसभेत मविआच्या ३८ जागा जिंकून आल्या असत्या”, असं ते म्हणाले होते. तसेच “आता विधानसभेत राज ठाकरेंनी ४०० जागा लढाव्यात. महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे, हा राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस आजही शिवसेनेच्याच पाठिशी आहे”, असा टोलाही त्यांनी लागवला होता.