परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन मनसे विरुद्ध भाजप असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. उत्तर भारतीयांनी मुंबईचा गौरव वाढवला असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने तिखट शब्दात टीका केली आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, तर भय्या भूषण हा पुरस्कार नक्की मिळेल, असा चिमटा मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी काढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. बुधवारी मुंबईतील घाटकोपरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचे कौतुक केले होते. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात भर घातली, असे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीस यांच्या विधानाचा मनसेने समाचार घेतला आहे. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही. पण भय्याभूषण हा पुरस्कार नक्की मिळेल अशी टीका त्यांनी केली. नाना पाटेकर देखील भय्या भूषण पुरस्काराच्या स्पर्धेत सामील झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा कोणत्या भाषेचा नाही, असे त्यांनी सांगितले.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांचे विधान हास्यास्पद असून परप्रांतीय लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्याचा विकास झाला नाही म्हणून ते इथे येतात. ही लोकांमुळे मुंबई महान कशी होणार असा सवाल त्यांनी विचारला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मनसेने ट्विटरवरुनही समाचार घेतला. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर वरवंटा फिरवून मुंबईतील मराठी माणसाचे, त्याच्या अस्तित्वाचे सतत खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजप नेत्यांनी सुरु केला आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्रात काही ताठ कण्याचे, मराठी बाण्याचे देशव्यापी नेतेही झाले पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड न करता, असे नमूद करत मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटोही पोस्ट केला. या फोटोत आंबेडकर यांनी केलेल्या विधानाचा समावेश आहे. ‘मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते, तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे’ असे आंबेडकर यांनी म्हटल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर वरवंटा फिरवून मुंबईतील मराठी माणसाचे, त्याच्या अस्तित्वाचे सतत खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजप नेत्यांनी सुरु केलाय. या महाराष्ट्रात काही ताठ कण्याचे, मराठी बाण्याचे देशव्यापी नेतेही झाले पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड न करता… pic.twitter.com/w9qpoPECWV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 30, 2017