दापोली – कोकण रेल्वे स्थानकामध्ये पार्किंगच्या परप्रांतीयांना देण्यात आलेल्या ठेक्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. चिपळूण रेल्वे स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकाराचा जाबविचारला. चिपळूण वालोपे येथील रेल्वे स्थानकात पे अँड पार्कचे असलेले दोन कर्मचारी स्थानिक लोकांजवळ अरेरावी व दादागिरी करतात अशा तक्रारी आमच्याकडे असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावर या कामांसाठी मराठी माणूस प्रशासनाला मिळाला नाही का? असा जाब पे अँड पार्कच्या ठेकेदारांच्या विषयावरून प्रशासनातील उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
पे अँड पार्कच्या सेवेसाठी बाहेर राज्यातील परप्रांतीय युवक कार्यरत आहेत. येथील स्थानिक युवक सक्षम असूनही त्यांना रोजगाराच्या संधीपासून दूर ठेवण्यात आले आहे. येथील रेल्वे साठी स्थानिक लोकांच्या जमिनी दिल्या गेल्या आहेत. परंतु येथील स्थानिकांना या पे अँड पार्कचा ठेका न देता परप्रांतीयांना ठेका देण्यात आला. हा येथील स्थानिक तरुण लोकांवरती होणारा अन्याय आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने अन्याय होवू देणार नाही अशी भूमिका घेणारे पत्र जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी रेल्वे प्रशासना दिले. याविषयी मनसेचे राज्य सरचिटणीस कोकण संघटक वैभव खेडेकर यांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन जाब विचारला.