मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. याआधी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार म्हणून सुरू असलेली चर्चा आता हा दौरा स्थगित झाल्यामुळे सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी “अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी मदत मागितली असती, तर आम्ही सहकार्य केलं असतं”, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. यावर आता मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या तूर्तास अयोध्या दौरा स्थगित या ट्वीटनंतर त्यावरून सुरू झालेल्या तर्क-वितर्कांवर हे उत्तर देण्यात आलं आहे.

राज ठाकरेंचं ट्वीट

राज ठाकरेंनी आज सकाळीच ट्वीट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याचं जाहीर केलं आहे. “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू” असं म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी निशाणा साधल्यानंतर मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

“…तर राज ठाकरेंना मदत केली असती”

आम्हाला विचारलं असतं, तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले आहेत. “इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते. त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं. अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“पुण्यात सर्वांचा चोख हिशोब केला जाईल!”

दरम्यान, दौरा स्थगित केल्यानंतर सुरू झालेल्या तर्क-वितर्कांना मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल असा आहे. जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? मीडिया आणि विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” अशी फेसबुक पोस्ट किर्तीकुमार शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, पुण्यातील सभेच्या दोनच दिवस आधी अयोध्या दौरा रद्द होणे आणि त्यावरून तर्क-वितर्क सुरू होणे यामुळे राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढू लागली आहे.