मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले आहेत. तसंच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं आहे.

राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच मनसेला मोठा झटका, रुपाली पाटलांचा राजीनामा

दरम्यान रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,” असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

रुपाली पाटील यांनी राजीनाम्यात काय म्हटलं आहे?

“सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र,” असं रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणार? चर्चांना उधाण

दरम्यान, रुपाली पाटील यांचा मनसे पक्षांर्गत बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळेच अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता त्या कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या रुपाली पाटील ठोंबरे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे. रुपाली पाटलांकडूनही लवकरच याबाबत घोषणा करू असं सांगितलं जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुणे दौरा

दरम्यान, राज ठाकरे यांचा १५ डिसेंबरला पुणे दौरा आहे. ते बुधवारी सकाळी ८ वाजता सुरुवातीला शिवाजीनगर येथील रोकडोबा मंदीर येथे एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. यानंतर सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात असतील. यानंतर ते बॅकवेट हॉल, झाशीची राणी चौक बालगंधर्व येथे दुपारी १२ ते २ या वेळेत असतील. कोथरूड मतदारसंघात सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत ते रत्ना बॅक्वेट हॉल (कर्वेनगर) येथे असतील.

सायंकाळी ६ ते साडेसात या वेळेत राज ठाकरे खडकवासला मतदारसंघात धायरेश्वर हॉल (धायरी) येथे असतील. हडपसर मतदार संघात ते राज बॅक्वेट हॉल (कोंढवा गाव) येथे राहतील.