महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.  यादरम्यान भाजपाच्या आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.

“पक्षाच्या वतीने येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये मनसेचे मत भाजपाला मिळावे यासाठी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले. त्यामुळे मत आम्हाला पडणार असल्याने आमचा विजय आणखी सोपा होणार आहे,” असे आशिष शेलार म्हणाले.

त्यामुळे आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्य़ा मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपाने ही संधी साधली आहे.

दरम्यान, राज्यसभेची निवडणूक भाजपाने लादली असून राज्यात एक षडयंत्र सुरू आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन करत बंगालमध्ये तृणमूलने भाजपला गाडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ असून आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकजूट दाखवून विजय मिळवू आणि नंतर विजयोत्सव साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. तर आपल्याकडे पूर्ण संख्याबळ असल्याने     चारही उमेदवारांची विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आमदारांच्या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने विजय निश्चित असल्याचा संदेश दिला.