सोलापूर : समाजात आजही मोठ्या प्रमाणावर चांगले कार्य घडते आहे. ही सकारात्मक गोष्ट दिसण्यासाठी फक्त दृष्टिकोन सकारात्मक हवा. समाजात वाईटपणाचा बोलबाला जास्त दिसतो. प्रत्यक्षात चांगुलपणाचे काम चाळीस पट अधिक वेगाने सुरू आहे. जिथे एक चांगले काम होते, तिथे दुसऱ्या चांगल्या कृतीची बीजही आपसूकच पेरले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
सोलापुरातील ‘उद्योग वर्धिनी’ संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हुतात्मा स्मृतिमंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या कार्यक्रमात भागवत यांनी, महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत उद्योग वर्धिनीचा मुक्तकंठाने गौरव केला. ते म्हणाले, महिलांचा सन्मान आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणे हे केवळ सामाजिक नाही तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.
देवाने स्त्री-पुरुषांना समान गुण दिले आहेत. पण विशेषतः महिलांना वात्सल्य हा विशेष गुण दिला आहे. यामुळेच त्यांना मोठेपणा प्राप्त होतो. त्यामुळे पुरुषांनी कधीही त्यांच्या उद्धाराचा अहंकार बाळगू नये. महिलांना समान संधी देणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा ठरते, असेही मत त्यांनी मांडले. देश मोठा करायचा असेल तर १४२ कोटी लोकसंख्येचा समाज संघटितपणे कार्यरत राहिला पाहिजे. प्रत्येक माणसाचा सहभाग हा राष्ट्र निर्मितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. समाज जेव्हा संघटनात्मक रीतीने नि:स्वार्थ कार्य करतो, तेव्हाच देशाचे भाग्य खऱ्या अर्थाने बदलते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, उद्योग वर्धिनीच्या सचिव मेधा राजोपाध्ये आदी उपस्थित होते. राम रेड्डी यांच्यासह उद्योग वर्धिनीत कार्यरत वासंती साळुंखे व मीनाक्षी सलगर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग वर्धिनीच्या अध्यक्षा, भाजपच्या माजी नगरसेविका चंद्रिका चौहान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुहासिनी शहा यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. माधवी रायते यांनी केले. तर अपर्णा सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.