नांदेड : मोहन भागवत यांच्यावर बालवयात कुटुंबातूनच संघ विचारांचा संस्कार झाला होता. त्यांच्या आधीच्या पिढीतील अनेक स्वयंसेवकांनी घरदार किंवा शिक्षण सोडून संघ कार्यासाठी वाहून घेतले; पण भागवत यांनी नागपूर येथे पशूवैद्यक शास्त्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून संघामध्ये प्रचारक पदापासून काम सुरू केले. महाविद्यालयीन जीवनापासूनची शिस्त आणि साधेपणा त्यांनी पुढेही जपला, असे मोहन भागवत यांच्या विद्यार्थिदशेतील मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना नमूद केले आहे.

रा.स्व.संघाचे सरसंघचालकपद गेली १६ वर्षे भूषविणार्‍या भागवत यांनी गुरुवारी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एक विस्तृत लेख लिहून संघप्रमुखांना शुभेच्छा दिल्या. देशभरातील स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांकडून भागवतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना विद्यार्थिदशेतील त्यांचे अनेक मित्र मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी विखुरले असल्याचे दिसून आले.

‘मराठवाडा’कार अनंतराव भालेराव यांचे पुत्र डॉ.अशोक भालेराव हे १९६५ ते १९६९ दरम्यान वरील महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मोहन भागवत दोन वर्षे त्यांच्या मागे होते. उद्गीरचे रहिवासी असलेले डॉ.सुभाष कुमठेकर यांच्यासह मराठवाड्यातील के.बी.पाटील, डॉ.पोपशेटवार, ए.एम.कुलकर्णी हे सर्व विद्यार्थी मात्र भागवत यांचे वर्ग आणि वसतिगृहातील मित्र. वसतिगृहात एकत्र राहिल्यामुळे तेव्हा निर्माण झालेले स्नेहबंध आजही कायम असल्याचे कुमठेकर यांनी सांगितले.

सुमारे ५५ वर्षांपूर्वीच्या तरुणाईतील आठवणी जागवताना डॉ.भालेराव यांनी सांगितले की, महाविद्यालयात ‘आम्हां काहींची गणना उनाड विद्यार्थ्यांमध्ये होती; पण मोहन भागवत हे पहिल्या वर्षापासून एक शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्यावर लोभ होता. आमचे महाविद्यालय नागपूर शहरापासून बरेच दूर होते. संघाच्या कार्यासाठी मोहन भागवत वेळोवेळी नागपूर आणि इतरत्र जात असत. त्या काळात त्यांच्याकडे स्वतःची सायकल होती, याचे इतर विद्यार्थ्यांना अप्रूप वाटत असे.’

सुभाष कुमठेकर म्हणाले की, भागवत यांना गेल्या काही वर्षांपासून आपण सरसंघचालक पदावर बघत असलो, तरी हे सर्वोच्च पद प्राप्त करण्यासाठी त्यांनी आपली योग्यता सुरुवातीच्या काळातील कार्यापासून दाखवून दिली. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांच्यातील वादपटू आणि वक्त्याचा परिचय आम्हाला झाला होता. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते भाग घेत असत. स्पर्धेतील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही काही विद्यार्थी मित्र आवर्जून जात असू. सर्व एकत्र न बसता वेगवेगळ्या कोपर्‍यामध्ये बसायचो आणि आवश्यक तेथे भागवतांच्या भाषणावर टाळ्या वाजवून त्यांना दाद द्यायचो. यांतून त्यांच्या भाषणाचा प्रभाव इतरांवर पडायचा. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळविली.

महाविद्यालयाच्या वसतिगृहात असताना शेजारच्याच एका मोकळ्या मैदानात मोहन भागवत यांनी आमच्यातील पाच मित्रांना सोबत घेऊन संघाची शाखा सुरू केल्याची आठवणही कुमठेकर यांनी सांगितली. संघाची शाखा चालवणारा एक विद्यार्थी ते सरसंघचालक हा मोहन भागवत यांचा प्रवास अत्यंत विलक्षण आणि ध्येयनिष्ठ असल्याचे भालेराव आणि कुमठेकर यांनी नमूद केले. कार्यक्रमांच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्यावर तेथे आपले जुने मित्र असतील, तर त्यांना भागवत आवर्जून भेटतात, ख्यालीखुशाली विचारतात, जुन्या आठवणींमध्ये रमतात, असे कुमठेकर म्हणाले.

मागील काळात काही कार्यक्रमांनिमित्त भागवत संभाजीनगरात बर्‍याचदा आले. त्या दरम्यान एक-दोनदा त्यांना भेटण्याचा योग आला, तेव्हा विद्यार्थिदशेतला साधेपणा त्यांनी आजही जपला असल्याचे जाणवले, असे डॉ.भालेराव यांनी नमूद केले. एका मोठ्या जबाबदारीमुळे भागवत हे मागील अनेक वर्षांपासून व्यग्र असले, तरी वेगवेगळ्या निमित्ताने वर्षातून किमान एकदा तरी जुन्या मित्रांना एकत्रपणे भेटण्याचा प्रयत्न ते मनापासून करतात, असे सांगण्यात आले.