सोलापूर : बार्शी येथे एकाच कुटुंबातील चौघा जणांनी केलेल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले असून खासगी सावकाराकडून होणाऱ्या त्रासामुळे वैतागून कोकाटे कुटुंबीयांनी आत्महत्या करण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात सोलापूरच्या संबंधित खासगी सावकाराविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
बार्शीत अलीपूर रस्त्यावर राहणाऱ्या भैरवनाथ शिवाजी कोकाटे (वय ४०), त्यांच्या पत्नी मनीषा कोकाटे (वय ३६) आणि त्यांची मुले प्रशांत (वय १५) व मुलगी प्रतीक्षा (वय ११) अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी कोकाटे कुटुंबातील चौघा जणांची नावे आहेत. मृत भैरवनाथ कोकाटे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायातून त्यांनी बराच पैसा कमावला होता. परंतु तरीही अलीकडे आर्थिक अडचणीमुळे त्यांनी सोलापुरातील शंकर ऊर्फ उल्हास उत्तम कदम (रा. सोलापूर) या खासगी सावकाराकडून दरमहा दोन टक्के व्याजदराने चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचे व्याज कोकाटे यांनी वेळोवेळी दिले होते. तरीही कदम याने आणखी व्याजाची मागणी करीत मानसिक त्रास दिला. त्यामुळे भैरवनाथ यांनी आपला मुलगा प्रशांत याच्या हस्ताक्षरात चार पत्र लिहून आत्महत्या करण्याचे कारण नमूद केले होते. यात सावकार शंकर कदम याच्या त्रासाला कंटाळून आपण कुटुंबीयांसह आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. शेती व्यवहारासह ५० हजार रुपयांसाठी बुलेट मोटारसायकल मित्राकडे तारण ठेवल्याचा अन्य पत्रात उल्लेख आहे. तसेच गाय-म्हशीच्या व्यवहाराचाही त्यात उल्लेख आहे. या संदर्भात मृत भैरवनाथ यांचे बंधू देवीदास शिवाजी कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खासगी सावकार शंकर कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.