जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अविरतपणे कोसळणाऱ्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली असली तरी गेल्या वर्षीच्या दुष्काळाची कसर यंदाचा पाऊस भरून काढण्याची चिन्हे आहेत. २००२ ते २००४ या काळातील दुष्काळापाठोपाठ ‘२६ जुलै’ सारखा दिवस दाखवणारा २००५चा पाऊस यंदा पुन्हा त्याच ‘चक्रा’ची पुनरावृत्ती करीत आहे. २०११ व १२ या दुष्काळी वर्षांनंतर यंदा दोन महिन्यांतच महाराष्ट्रात दीडपट पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशभरात गेल्या वीस वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेली दोन वर्षे अपुऱ्या पावसाची होती. गेल्या वर्षी तर राज्याच्या एकतृतीयांश भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यंदा महाराष्ट्राच्या सर्वच उपविभागांमध्ये दमदार हजेरी लावली. कोकण व मराठवाडय़ात सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात १३० टक्के, तर विदर्भात जवळजवळ दुप्पट (१९० टक्के) पाऊस पडला आहे. पावसाचा सूर पाहता आताच्या हंगामात हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे.
१९९४ नंतर प्रथमच अतिवृष्टीचे वर्ष?
भारतात गेल्या वीस वर्षांत तीन मोठे दुष्काळ पडले. त्यात २००२, २००४ व २००९ या वर्षांचा समावेश होता. मात्र, गेल्या वीस वर्षांमध्ये एकही वर्ष अतिवृष्टीचे ठरले नाही. अशा वर्षांसाठी देशातील पाऊस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त असावा लागतो. १९९४ साली असे घडले होते. त्यानंतर तसे झाले नाही. या पावसाळ्यात देशात आतापर्यंत पाऊस सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त पडला आहे. त्यामुळे या वर्षी एकूण पाऊस सरासरीपेक्षा १० टक्के जास्त राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाऊसचक्र
२००२ व २००३ साली महाराष्ट्रात अपुरा पाऊस होता, तर २००४ साली मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात पोळला होता.
२००५-२००६ ही वर्षे महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीची ठरली. मध्य महाराष्ट्रात सलग दोन वर्षे दीडपट पाऊस पडला. मुंबईतील २६ जुलैचा विक्रमी पाऊस, कोकणातील दरडी कोसळणे आणि राज्याच्या जास्तीत जास्त भाग एकाच वेळी पुराने वेढला जाणे या घटना त्या वर्षांमध्ये घडल्या.
याचीच पुनरावृत्ती आता होत आहे. विदर्भ व कोकणात पूरपरिस्थिती आहे. मध्य महाराष्ट्रातही कृष्णा, कोयना, पंचगंगा, मुळा-मुठा या नद्यांकाठी पुराचा धोका निर्माण झाला आहे.
ही पुनरावृत्ती आहे. मात्र, त्यामागे कोणतेही चक्र असल्याचे मानता येणार नाही. त्यात योगायोगाचा भाग अधिक आहे. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातही यंदा मोठय़ा पावसाची आशा आहे.
– डॉ. ए.के. श्रीवास्तव, नॅशनल क्लायमेट सेंटर, पुणे</strong>

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most rain of 20 years in this season
First published on: 26-07-2013 at 05:36 IST