उत्पादित मालाला घसघशीत मोबदला मिळाल्यास उत्पादकांचा उत्साह दुणावतो आणि उत्पादनवाढीसाठी चढाओढच सुरू होते. ग्रामीण भागात अपवादाने दिसणारा हा अनुभव कारंजा-आष्टी परिसरात आज परवलीचा ठरू लागला आहे. राष्ट्रीय दुधविकास महामंडळाने खरेदीची व्यवस्था सुरू केल्यानंतर या परिसरातील दूध उत्पादकांचा फायदा होऊ लागला आहे. २५ रुपये लिटरने वर्षभरापूर्वी दूध विकणारे हे उत्पादक किमान ५५ रुपयांचा भाव मिळू लागल्याने आनंदित आहेत. पडत्या भावामुळे गुरेढोरे विकून नव्या कामांच्या शोधातील गवळी समाज आज परत पारंपरिक दूधदुभत्याच्या व्यवसायाचा विस्तार करू लागला आहे.
दूध महामंडळाच्या मदर डेअरी या ब्रँडने चालणाऱ्या दूध व्यवसायाने आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यांत वर्षभरापूर्वी संकलन केंद्रे सुरू केली. हा परिसर तसा गवळ्यांचा म्हणूनच पूर्वीपासून परिचित आहे. वनसंपदा असल्याने चाऱ्याची चिंता कधीच नव्हती; परंतु दुधाला भाव मिळत नव्हता. पाणी असलेले दूध २० रुपये लिटर, तर विनापाणी २५ रुपये लिटरने विकले जाई. चाऱ्याचा, पाण्याचा व पशुखाद्याचा मेळ साधताना हा भाव त्यांना परवडत नसे. पारंपरिक धंदा म्हणून हा व्यवसाय चालूच होता; पण नव्या गाई-म्हशींची खरेदी थांबली. नव्या व्यवसायाचा शोध सुरू करण्याची मानसिकता असतानाच मदर डेअरीने राज्य शासनाच्या विनंतीवरून या परिसरात दूध संकलन केंद्रे सुरू केली. आता या परिसरातील दूध व्यावसायिकांची मानसिकता पूर्णच बदलल्याचे चित्र आहे. या तीन तालुक्यांतील १४० गावांची निवड मदर डेअरीने केली असून १ हजार १८७ किलो दुधाचे मासिक संकलन केले जात आहे. त्यासाठी परिसरातच ५० संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. संकलन केंद्रावर दुधाची तपासणी होते. म्हशीच्या दुधात किमान सहा टक्के मेद (फॅ ट्स) असल्यास ४० रुपये किलोचा भाव मिळतो; पण त्यापेक्षा अधिकच मेदाचे प्रमाण आढळून येत असल्याने ५० ते ५८ रुपये किलोचा भाव या दूध उत्पादकांना मिळू लागला आहे. गाईचे दूध ४२ रुपये लिटरने विकले जात आहे. विशेष म्हणजे यात दलालीची साखळी नसल्याने दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यांचा आधार व बँक खाते क्रमांक मदर डेअरीकडे असून थेट खात्यावर एका आठवडय़ात पैसे जमा होतात.
या संकलनासाठी कंपनीने सहायकांची नेमणूक केली आहे. निवड झालेल्या गावातील किमान आठवा वर्ग उत्तीर्ण व या व्यवसायाची माहिती असणाऱ्या युवकाची ग्रामसभेतून निवड होते. मात्र तो इतर कंपन्यांशी संबंधित नसावा, दलालीचे काम न करणारा, तसेच दुग्धजन्य दही, तूप अशा पदार्थाची विक्री करणारा नसावा, अशा अटी आहेत. त्याच्यामार्फ त गावातून दूध गोळा केले जाते व ते थेट कंपनीकडे सुपूर्द होते.
दूधभेसळ थांबवण्यात यश
तळेगाव (रघुजी) येथील नीलेश गलाट हा युवा शेतकरी अगदी आनंदात अनुभव सांगतो. त्याला विचारणा केल्यावर त्याने सुगीचे दिवस आल्याची प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे तीन म्हशी आहेत. सकाळी दहा व संध्याकाळी पंधरा लिटर दूध विकतो. सकाळच्या दुधाला ५५ ते ५८ रुपये, तर संध्याकाळच्या दुधाला ५० रुपये किलोचा दर मिळतो. मदर डेअरी येण्यापूर्वी तीस रुपयांच्या वर कधीच भाव मिळाला नाही. चारा पुरेसा आहे, पण आणखी जनावरे घेण्यासाठी तसेच चांगले पशुखाद्य मिळण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. हा धंदा चांगला बरकत देणारा ठरेल, अशीच भावना कंपनीशी संलग्न सर्वच दूध व्यावसायिकांची आहे. या परिसरात गवळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांच्यासोबतच आता पशुधन बाळगणारे इतरही शेतकरी या व्यवसायात येण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळाली. मदर डेअरीने वर्धेसह नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, चंद्रपूर व नांदेड या जिल्ह्य़ांची निवड दूध संकलनासाठी केली आहे. या सहा जिल्ह्य़ांतील ६९३ गावांतल्या ८ हजार ७८९ दूध उत्पादकांना घसघशीत भावाचा लाभ सध्या मिळत आहे. पुढील टप्प्यात कृत्रिम रेतन सेवेचा विस्तार, पशुखाद्य मार्गदर्शन व पुरवठा, वैरण विकास, वांझ गाई, म्हशीचे निदान व गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा देणे प्रस्तावित आहे. संघटितपणे दुग्धव्यवसाय करीत योग्य बाजारभाव मिळवून देण्याचा व उत्पादनवाढीचा हेतू या योजनेमागे आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू म्हणाले की, हा दूध उत्पादनवाढीचा प्रकल्प आणखी काही गावांत पोहोचणार आहे. जनावरांची मागणी वाढत आहे. देशी गाय दीड लिटर, जर्सी गाय सहा लिटर, तर म्हैस चार लिटर दूध एका वेळी देते. देशी गाई मोठय़ा प्रमाणात आहेत. कृत्रिम रेतनाद्वारे उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. या तीन तालुक्यांखेरीज उर्वरित तालुक्यातही दूध संकलन केंद्रे सुरू होऊ शकतात. चांगला भाव मिळू लागल्याने दूधभेसळीचा प्रकार त्या परिसरात पूर्णपणे थांबला. ही एक चांगली सुरुवात आहे.