जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार शिवारात घडलेल्या मायलेकीच्या खुनाला नवे वळण लागले आहे. दोन्ही खून आपल्या प्रेयसीने सालगडय़ाच्या मदतीने केल्याची तक्रार मृत नंदा दाभाडे हिचा पती रामप्रसाद यांनी पोलिसांत दिली. त्यावरून पांडुरंग दाभाडे याला अटक करण्यात आली.
टाकळखोपा रस्त्यालगत दाभाडे यांच्या शेतातील आखाडय़ावर त्यांची दुसरी पत्नी नंदा व ३ वर्षांची मुलगी आरती यांचा शुक्रवारी मध्यरात्री खून झाला. या प्रकरणी दाभाडे यांनी जिंतूर पोलिसांत शनिवारी रात्री तक्रार दिली. दाभाडे यांचा पहिला विवाह झाला असून पहिली पत्नी व मुले परभणीत त्यांच्यासह राहतात. परभणीतील हेमलता जाधव या महिलेशी त्याचे सूत जुळले. परंतु तिच्या चारित्र्याचा संशय आल्याने रामप्रसाद यांनी हे संबंध तोडून टाकले. त्यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
दाभाडे हे पूर्णा येथे नोकरीवर असताना नंदाबाई सातपुते (दाभाडे) हिच्याशी त्यांचे सूत जुळले. तिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यानंतर नंदाबाई तिच्या मुलीसोबत दाभाडे यांच्या आडगाव बाजार येथील शेतातील आखाडय़ावर राहत असे. दाभाडे याने आपल्या शेतात काम करण्यासाठी बाळू ऊर्फ पांडुरंग दाभाडे व देवीदास खाडप या दोन सालगडय़ांना आणले होते. दोघेही आखाडय़ावर राहत. नंदाबाईमुळेच रामप्रसाद आपल्यापासून दुरावल्याचा संशय हेमलता जाधव हिला होता. त्यावरून ती नंदाबाईस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होती, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली. तसेच बाळू ऊर्फ पांडुरंग या शेतगडय़ासोबत हेमलता दूरध्वनीवर बोलत असे. यावरून हेमलता व पांडुरंग या दोघांनी संगनमत करून नंदा व आरतीचा खून केला असल्याचा आरोप रामप्रसाद यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारी केला. त्यावरून दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पांडुरंग दाभाडे यास पोलिसांनी अटक केली. हेमलता जाधव फरारी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2014 रोजी प्रकाशित
सालगडय़ाच्या मदतीने प्रेयसीने खून केल्याची मृत महिलेच्या पतीची तक्रार
जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार शिवारात घडलेल्या मायलेकीच्या खुनाला नवे वळण लागले आहे. दोन्ही खून आपल्या प्रेयसीने सालगडय़ाच्या मदतीने केल्याची तक्रार मृत नंदा दाभाडे हिचा पती रामप्रसाद यांनी पोलिसांत दिली.

First published on: 09-12-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother daughter murder case in parbhani