भाजपाच्या नेत्या आणि अमरावतीच्या विद्यामान खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राबाबत मोठा दिलासा दिला आहे. त्यांचं जातप्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. अमरावतीतून त्या भाजपाच्या तिकिटावर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आजच उमेदवारी अर्जही दाखल केला. त्याच दिवशी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशात नवनीत राणा या भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“मागच्या १२ वर्षांपासून मी संघर्ष केला. विरोधकांनी मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. तसंच मला खूप त्रास दिला. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका झाली. मी माजी सैनिकाची मुलगी आहे आणि एक महिला आहे. मात्र कुठपर्यंत त्रास सहन करावा लागतो हे मी या सगळ्या कालावधीत पाहिलं. मी राजकारणात आल्यापासून मला हे सगळं सहन करावं लागलं. एका बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे किंवा तिच्या जातीच्या प्रमाणपत्रावर बोलायचं हे सगळंच घडलं आहे.” असं नवनीत राणा म्हणाल्या.

माझी मुलं मला विचारायची आई तू काय केलं आहेस?

“एका महिलेला कसा त्रास दिला जातो, तिचा मानसिक छळ कसा केला जातो हे मी अनुभवलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मला न्याय दिला. हा फक्त माझा एकटीचा विजय नाही तर माझ्याप्रमाणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विजय आहे. माझी मुलं मला २०१३ पासून विचारायची की आई तू असं काय केलं आहेस की तुला तुरुंगात जावं लागेल असं म्हटलं जातं? आज सर्वोच्च न्यायालयाने दूध का दूध आणि पानी का पानी केलं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते.” असं नवनीत राणा म्हणाल्या आणि त्यांच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं होतं. त्या प्रचंड भावूक झालेल्या पाहण्यास मिळाल्या.

हे पण वाचा- “नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने आशीर्वाद दिला”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मी खोटारडी आहे असा प्रचार केला गेला

माझ्या विरोधात २०१९ ला सगळे बोंब ठोकत होते की मी खोटी आहे, मी बनावट कागदपत्रं सादर केली आहेत. मी सगळ्यांना सांगत होते की माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं बोलते आहे. माझ्या अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला लोकसभेत पाठवलं. याचा मला आनंद आहे. माझं घर, माझी सासूरवाडी, माझे अमरावतीकर सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवला. आज मी खासदारीला पुन्हा उभी राहते आहे आणि त्याच दिवशी हा निर्णय आला आहे याचा मला विशेष आनंद वाटतो आहे. अमरावतीकरही माझ्यासह जिंकले आहेत असं मला वाटतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी संविधान पाळणारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी आहे. महिलांना थांबवण्यासाठी बदनामी केली जाते. समाजात मान वर करुन जगू नये म्हणून खूप प्रयत्न विरोधकांनी केले. पण देव ज्याच्या पाठिशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नसते, तसंच आज झालं आहे असंही नवनीत राणा म्हणाल्या.