गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचं कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तीन हजार कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली होती. त्याचे फोटो संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यासोबत हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही केला आहे.

संभाजीराजे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी गुजरात सरकारचे कौतुकही केले आहे. “लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या स्मारकास भेट दिली. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचं कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे,” असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

“हे स्मारक साकारण्यासाठी गुजरात सरकारने मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, हे इथे आल्यावर जाणवते. इतके भव्य दिव्य स्मारक गुजरात सरकारने केवळ पाच वर्षांत बांधून पूर्ण केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे,” असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.