मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. गुरूवारी संतप्त जमावाने परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घराची नासधूस करून ते जाळण्याची प्रयत्न केला. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? पंतप्रधान मोदी गप्प का? एक राज्य जळत असून, लाखो लोकांचं पलायन सुरू आहे. तरीही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह बोलत नाहीत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसेच्या आगीत भडकलं आहे. शेकडो लोकांचा हिंसाचार आणि गोळीबारात मृत्यू झाला आहे. आमदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांचं घर जाळण्यात आलं. हजारो लोकांचं पलायन सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत,” असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं.

हेही वाचा : विरोधकांच्या ऐक्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता;नितीशकुमार यांचा दावा

“हिंदू-मुस्लीम राजकारण करता येत नसल्याने…”

“देशातील सीमेवरचं राज्य जळत असून, हिंसाचार सुरू आहे. लोक मारली जात आहे. मणिपूरमध्ये १०० च्या वर अतिरेकी घुसले आहेत. मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात येत नसून, गृहमंत्री बोलत नाहीत. या राज्यात हिंदू-मुस्लीम राजकारण करता येत नसल्याने ते गप्प आहेत का?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “सुनो द्रौपदी..”, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्रानंतर विनेश फोगाटने पोस्ट केली कविता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करता, तसा…”

“मणिपूरमध्ये घुसलेल्या १०० च्या वर अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्र आहे. ती शस्त्र चीन की म्यानमारकडून देण्यात आली का? याची माहिती पाहिजे. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही, म्हणून मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणिपूरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना चीनची मदत आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करता, तसा चीनवर करण्याची हिंमत आहे का?,” असं आव्हान संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.