Sanjay Raut On Uddhav Thackeray and Raj Thackeray : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना राज्याच्या राजकीय वर्तुळात उधाण आलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास काही अटी ठेवल्याचं बोललं जात आहे. पण खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मनसे-ठाकरे गटाच्या युतीसाठी ‘शिवतीर्था’वर जाऊन चर्चा करणार का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारला. यावर संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया देत तुम्हाला काय वाटतं आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर बोलत नाहीत का? मग का जाणार नाही?, असं त्यांनी म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. मला सांगा त्यात अट आणि शर्त कोणती? कोणतीही नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील महाराष्ट्राच्या हितासाठीच म्हणत आहेत. मग प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजपा बसत नाही. ही अट नाही, तर लोकभावना आहे. जर याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे. हा विषय विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महाराष्ट्र हितासाठी काम करत आहोत. मराठी माणसांचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय आहे. आता जर मतभेद आणि वाद दूर ठेऊन जर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. यामध्ये कोणतीही अट किंवा शर्त उद्धव ठाकरे यांनी ठेवलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. यात कोणती अट आणि शर्त आली?”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
“उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, जे लोक महाराष्ट्र हिताच्या आडवं येतील त्यांना घरात घ्यायचं नाही, त्यांचं स्वागत करू नका. यात चुकीचं काय आहे? महाराष्ट्र द्रोही कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे, राज ठाकरे हे सूज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्र द्रोही कोण आहे? पण काही लोक या चांगल्या कामात अडथळा निर्माण करणार असतील तर ते महाराष्ट्र हिताच नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘शिवतीर्था’वर जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करणार का?
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी ‘शिवतीर्था’वर जाऊन राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारला. यावर राऊत म्हणाले की, “तुम्हाला काय वाटतं आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर बोलत नाहीत का? मग का जाणारनाही? राज ठाकरे आणि आमचे संबंध आताचे नाहीत, दोन्ही ठाकरे हे भाऊच आहेत. कौटुंबिक कार्यक्रमाला एकत्र येतात, भेटतात. हे आपण पाहिलेलं आहे, मग हे तुम्हाला नकोय का?”, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.