सांगली : आपत्तीकाळात सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्यरत राहावे, असे आवाहन खा. विशाल पाटील यांनी बुधवारी केले.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या कार्यप्रणालीची माहिती पुस्तिका आज खा. पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. इद्रिस नायकवडी, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते. यावेळी मान्सूनपूर्व प्रशासनाची तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस महापालिकेसह वीज वितरण कंपनी, पाटबंधारे, पोलीस, महसूल आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने मान्सूनपूर्व केलेल्या कामाचे सादरीकरण केले.
महापूर व आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन खा. पाटील यांनी केले, तर आ. नायकवडी यांनी पूर काळात पाणी पातळी नागरिकांना वेळेत कळणे आवश्यक आहे, त्या बाबत फलक लावून माहिती देण्याबाबत नियोजन करावे असे सूचित केले आहे.
आमदार गाडगीळ यांनी सांगलीमधील पूर काळात काही अडचणी निर्माण होत असतात, त्यामध्ये पिण्याचे पाणी, वीज इत्यादी बाबत इतर विभागाच्या समन्वयाने या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. आयुक्त गांधी यांनी शहरातील धोकादायक इमारतींबाबत आढावा घेण्यात आला असल्याचे सांगून सहायक आयुक्त आणि अतिक्रमण पथक यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले. नाल्यावरील अतिक्रमणबाबतही अशीच भूमिका घेतली जाईल. प्रशासन सर्व दक्षता घेत असून, महापूर काळात निवारा केंद्र उभारणीबाबतही सतर्क आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.