Mukhyamantri Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा व वाद निर्माण झाले आहेत. आधी योजनेसाठीचे पात्रता निकष, नंतर त्यावर विरोधकांनी केलेली टीका आणि आता महायुतीमधल्याच मित्रपक्षांमध्ये योजनेचं श्रेय घेण्यावरून चढाओढ निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट या तिन्ही घटकपक्षांकडून लाडकी बहीण योजनेबाबत दावे केले जात आहेत. अजित पवार गटाकडून तर व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली असून त्यात त्यांनीच ही योजना दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लाडकी बहीण योजनेवरून स्पष्ट भूमिका मांडली आहे.

योजनेचं श्रेय नेमकं कुणाचं?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ठराविक निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना मासिक १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली. योजनेचं नाव ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असं असताना मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी पक्षांकडूनच ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख होत असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात आज माध्यम प्रतिनिधींनी शंभूराज देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असं नाव घेण्यास सांगितलं.

शंभूराज देसाई आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करताच शंभूराज देसाईंनी त्यात सुधारणा सांगितली. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ म्हणा. तुम्हीही सरकारी नाव जे आहे तेच घेत जा”, असं सांगितलं.

“कालपासून इतर लोकही हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा अनावधानाने फक्त लाडकी बहीण योजना असं नाव घेतलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत. दोन दिवस मी मतदारसंघातल्या १५-२० गावांमध्ये १००-१२५ महिलांना या योजनेसंदर्भात भेटलो. त्याचे व्हिडीओही आहेत. महिलांना जर विचारलं की ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्ट सांगत आहेत की एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे महिलांमध्ये हे नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं आणली आहे”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

दरम्यान, योजनेचा गैरवापर होत असल्याबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अशा प्रकरणांची चौकशी चालू आहे. महिला लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी नेमलं होतं. पण जेव्हा अशा बाबी लक्षात आल्या, तेव्हा फक्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच फॉर्म भरून घेतले जातील, असं नियोजन केलं आहे. ज्यांनी कुणी एवढ्या चांगल्या योजनेत चुकीची नावं, फॉर्म भरून, फोटो लावून गैरप्रकार केलेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील मुख्यमंत्री कोण व्हावेत?

दरम्यान, राज्यात सरकार आल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. “महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं मी गणरायाला घातलं आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय वरीष्ठ नेते बसून घेतील”, असं शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.