पुण्यातील विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ११ वर्षांनी निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. त्यापैकी सचिन अंदूरे आणि शरद कळसकर या दोन मारेकऱ्यांना दोषी मानून विशेष न्यायाधीशांनी या दोघांना जन्मठेप सुनावली आहे. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, हत्येचा सूत्रधार मोकाट असून तपास यंत्रणांनी त्याचा शोध घ्यावा असं नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्या तीन आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी सांगितलं.

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करत असतानाच नालासोपारा येथे तपास यंत्रणांनी २०१८ मध्ये अवैध शस्त्रसाठा पकडला होता. त्याच वेळी नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनाही पकडलं, तत्पूर्वी २०१३ ते २०१८ या पाच वर्षांमध्ये या हत्या प्रकरणाचा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. मात्र, आता या हत्या प्रकरणातील दोन्ही शूटर्सना (मारेकरी) शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तपासात घडलेली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही संपूर्ण ११ वर्षांची लढाई आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व हितचिंतक यांच्यासह इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने हा विषय लावून धरल्याने आज आपण इथवर पोहोचलो आहोत.

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, तब्बल ११ वर्षे विवेकाच्या मार्गाने आपण ही लढाई लढलो आणि आता न्याय आपल्या दृष्टीपथात आला आहे. ही भावना आमच्यासह सर्वांच्या मनात कायम जागृत राहील. मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र ज्या तिघांना शिक्षा झाली नाही त्यांच्याविरोधात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ. आमचे वकील अभय नेटगी यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंतची आमची वाटचाल चालू होती, जी पुढेही चालू राहील.

हे ही वाचा >> “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”, मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्याच्याविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकारी पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं विशेष न्यायाधीशांनी निकालात म्हटलं आहे. या तिघांविरोधात मुक्ता आणि हमीद दाभोलकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील.