गेले कित्येक दिवस रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पेण तालुक्यातील खारपाडा ते वडखळ दरम्यान महामार्गालगतची बांधकामे हटवण्यास सुरुवात झाली आहे. ज्या लोकांनी स्वत:हून बांधकामे हटवली नाहीत त्या बांधकामांवर प्रशासनाने हातोडा चालवण्यास सुरुवात केल्याने काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस बंदोबस्तात ही कामे हटविण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाला २०११ साली सुरुवात झाली होती. हे काम २०१४ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कर्नाळा अभयारण्य परिसरातील रुंदीकरण, भूसंपादन आणि ठेकेदाराची उदासीनता यामुळे हे काम रखडले होते. कर्नाळा अभयारण्यातील रुंदीकरणाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली आणि दळणवळण मंत्रालयाकडून ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. मात्र तरीही रस्त्याच्या कामाला गती मिळत नव्हती.
जवळपास दोन वर्षांपासून ठप्प असलेल्या या कामाला आता अखेर सुरुवात करण्यात आली. रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी बांधकामे हटवण्यास सुरुवात झाली आहे. खारपाडा, जिते, दुषमी, तरणखोप, उचेडे, रामवाडी, काश्मिरे या गावांतील बांधकामे हटवण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. जी बांधकामे स्थानिक स्वत:हून हटविणार नाहीत ती बांधकामे आता जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साह्य़ाने पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रशासनाच्या मदतीने सुरू झालेल्या धडक कारवाईमुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने बांधकामे नष्ट केली. या वेळी पेणच्या प्रांताधिकारी निधी चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश्वर रेड्डी, तहसीलदार सुकेशिनी पगारे यांच्यासह महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुंदीकरणात जाणाऱ्या बांधकामांना २०१०मध्ये नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्याचा मोबदलाही त्यांना देण्यात आला होता. मोबदला मिळाल्यानंतर सात दिवसांत ही बांधकामे हटविण्यात येणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही अखेर प्रशासनाने ही बांधकामे हटवण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. २६ तारखेपासून वारंवार ध्वनिप्रक्षेपकांच्या माध्यमातून सूचित करण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रांताधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.