सावंतवाडी : मुंबई-गोवा जुन्या महामार्गावर कोलगाव आयटीआयजवळ रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते सुस्थितीत ठेवणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात ही आश्वासने हवेत विरली. खड्ड्यांमुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावला होता, त्यातच आता कोलगावनजीक भगदाड पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
कोलगाव आयटीआयजवळ रामुळवाडी फाट्यासमोर हा प्रकार घडला आहे. रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग खचल्यामुळे वाहतूक फक्त एका बाजूने सुरू आहे. या अरुंद महामार्गावर एकेरी वाहतुकीमुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
तातडीने दुरुस्तीची मागणी
या धोकादायक स्थितीमुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.