पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मुंबई-हैदराबाद या लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर येथे आज पहाटे पाच वाजता  हा अपघात झाला. इंदापूरजवळील पायल धाबा परिसरात हा अपघात झाला आहे. एम्पायर ट्रॅव्हल्सची ही बस असून जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या लक्झरी बसचा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.