तब्बल महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत गुलाल कोणाला लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे गोपीनाथ मुंडे विजयी होणार, असा अंदाज एकीकडे व्यक्त होत असताना राष्ट्रवादीही सुरेश धस यांना निसटता विजय मिळण्याची आशा बाळगून आहे. प्रशासनाने सर्वत्र तगडा बंदोबस्त लावला आहे.
राष्ट्रवादी नेतृत्वाने राजकीय ताकद पणाला लावून मुंडेंची कोंडी केल्याने बीडची लढत रंगली. त्यामुळे निकाल काय लागणार, याचे आखाडे गेला महिनाभर बांधले गेले. ७० टक्के मतदान झाल्याने निश्चित कोणीही निकाल सांगण्यास धजावत नाही. त्यामुळे गुलाल कोणाला, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली असून दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणी केंद्रांकडील नाळवंडी रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. निकालानंतर कोठेही अनुचित प्रकार घडू नये, या साठी साध्या वेशातील पोलीस व विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीसाठी दीडशे पोलिसांचा गराडा राहणार आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.
निकालानंतर विजय साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांनी ६० टन गुलाल आणि फूल दुकानदारांनी मोठया प्रमाणावर फुले व हारांची तयारी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2014 रोजी प्रकाशित
मुंडे की धस? उत्सुकता शिगेला
तब्बल महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत गुलाल कोणाला लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First published on: 15-05-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde or dhus beed