अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात अत्याचार, हत्येचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने जवळे पंचक्रोशीसह पारनेर तालुका हादरला आहे

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पारनेर : तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडितेच्या वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल यांच्यासह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक त्यांचे पथक पारनेर पोलीस ठाण्यात तसेच जवळे येथील घटनास्थळावर ठाण मांडून आहेत. तपासात काही प्रगती झाली नसल्याचे चित्र असले तरी पोलीस ठोस निष्कर्षांप्रत पोहोचले असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल व गुन्ह्याचा उलगडा होईल असे समजते.

बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जवळे येथील बारशिले वस्तीवरील अल्पवयीन शाळकरी मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या तिच्या घरी आढळला होता.या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भरदिवसा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने जवळे पंचक्रोशीसह पारनेर तालुका हादरला आहे. जवळे पंचक्रोशीत दहशत निर्माण झाली असून मुलींना शाळेत पाठवायचे कसे, मुलींना घरी ठेवून शेतात मोलमजुरीसाठी जायचे कसे, असे सवाल संतप्त महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना उपस्थित केले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संस्थांनी मुलीच्या हत्येच्या घटनेचा निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात व भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी तहसीलदार व पारनेर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्ह्याचा तातडीने छडा लावून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करावा, अशी मागणी केली आहे. राज्यात महिला, मुलींवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आघाडी सरकार ठोस भूमिका घेत नसल्याची टीका अश्विनी थोरात यांनी केली आहे. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. तालुक्यात गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे.

अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ जवळे येथे गुरुवारी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान गावातील अवैध दारू व्यावसायिकांविरोधात संताप व्यक्त केला होता. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावात गुन्हेगारी वाढली. त्यातूनच हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पाश्र्र्वभूमीवर गावातील अवैध व्यवसाय काही काळ बंद राहतील अशी अपेक्षा होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा जवळे येथे तैनात असतानाही अवैध व्यवसाय मात्र बिनदिक्कत सुरू असल्याने अवैध व्यवसायाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला हतबल झाल्याचे चित्र आज जवळे येथे होते.

राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराचे रोज एक प्रकरण पुढे येत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे हे निदर्शक आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आहे तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगारांवर वचक बसेल असे कायदे करण्याची आवश्यकता आहे.

 – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Murder case filed against unknown person in connection with the death of minor girl zws

ताज्या बातम्या