धुळे शहरातील कुमारनगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षीय व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अवघ्या ३ हजार ४०० रुपयांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील कुमारनगर भागात मृत चिनू पोपली हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी रात्री दोन जण मृत पोपली यांच्या घरी आले होते. यावेळी अज्ञातांनी पोपली यांच्या पत्नीला ते कोठे आहेत? याबाबत विचारणा केली. त्यांनी पोपली बाहेर गेल्याचं सांगितल्यानंतर संबंधित दोघेही दुचाकीवरून निघून गेले.

हेही वाचा- सांगली : शेतकऱ्यांची फसवणूक करणारा पुण्यातील शिवाई ॲग्रो हेल्थ कंपनीचा संचालक अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर काही वेळातच चिनू पोपली आपल्या घराजवळ आले असता, तिन्ही आरोपी परत आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी थेट चिनू पोपली यांच्यावर गोळ्या झाडल्या. या धक्कादायक प्रकारानंतर जखमी अवस्थेत चिनू पोपली घरी आले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पत्नीला सांगितला. त्यानंतर पोपली यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.