कराड : कराड तालुक्यातील वाठार येथून गुरुवारपासून (दि. १०) बेपत्ता झालेल्या पाचवर्षीय बालिकेचा खून झाल्याचे शुक्रवारी पहाटे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, तिने खुनाची कबुली दिली आहे.कराड विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर याबाबतची देताना म्हणाले, ‘संशयित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने खून करण्यामागे बालिकेच्या आईने टोमणे मारल्याने हे कृत्य केल्याचे कारण दिले आहे. मात्र, हे कारण पोलिसांना पटणारे नसल्याने या घटनेचा विविध अंगांनी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.’

गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसासह नातेवाइकांकडून काल रात्रभर तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आज शुक्रवारी (दि. ११) पहाटे पाच वाजता वाठार ते रेठरे मार्गावर या बेपत्ता बालिकेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर एका १६ वर्षांच्या मुलीस याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तिने या खुनाची कबुली दिली असून, बालिकेच्या आईने टोमणे मारल्याने आपण हे कृत्य केल्याचे कारण तिने दिले आहे. मात्र, हे कारण पोलिसांना पटणारे नसल्याने या घटनेचा विविध अंगांनी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. कराड विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.