पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोटय़ा कुंडलिक धावडे (वय ३१) याचा गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भोसरीच्या धावडेवस्ती भागात १२ ते १५ हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याचे वार करून खून केला. हल्लेखोरांपैकी एकाचा या घटनेत गोळी लागून मृत्यू झाला, मात्र ही गोळी कुणी झाडली हे स्पष्ट होऊ शकले नाही. धावडे याचा एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे. ७ नोव्हेंबर २००६ रोजी लांडगे यांची हत्या झाली होती. याचा बदला घेण्यासाठीच धावडेचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.  खुनाच्या या घटनेनंतर भोसरी व धावडेवस्ती भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. आरोपींबाबत माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते.