सांगली : शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभांना गोंधळाची परंपरा आहे. मात्र, ही पध्दत बंद झाली पाहिजे. संवादातूनच विकास साध्य होतो. गोंधळाची परंपरा जर कायम राहिली तर शिक्षक म्हणून तुमचा काय आदर्श मुलापुढे राहणार असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक पारदर्शी कारभारामुळे राज्यात अग्रगण्य बँक बनेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षक बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, शिक्षक नेते संभाजी थोरात, जिल्हा उप निबंधक सुनील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु माने आदी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकात सांगितले, शिक्षकांच्या बारा संघटनांनी एकत्र येउन बँकेची सुसज्ज इमारत उभी करण्याचा शब्द निवडणुकीत दिला होता. यानुसार केवळ सव्वा वर्षात चार मजली इमारत उभी करण्यात आली असून या माध्यमातून सभासद शिक्षकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळ अशा बातम्या वाचण्यास मिळतात. कोल्हापूरमध्ये असा प्रकार काही वर्षापुर्वी घडला होता. मात्र, गोंधळाची परंपरा खंडित करून सभा चालवली पाहिजे. सभासदांचेे समाधान करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून कारभार पाहिला तर निश्चितच सभासद पाठीशी राहतात. बॅकेची इमारत उभी करण्यासाठी नफ्यातून तरतूद करण्यात आली ही बाब चांगली असून भविष्यात ही बँक राज्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावारूपास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बँकेचे संचालक अमोल शिंदे, शामगोंडा पाटील, रूपाली गुरव, शिवाजी जाधव, अमोल माने, महादेव हेगडे, बाळासाहेब कटारे, हंबीरराव पवार आदी उपस्थित होते. शेवटी बँकेच्या उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आभार मानले.