उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यानुसार ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.

जयंत पाटील म्हणाले, “आम्ही लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराविरोधात ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याचा महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ११ ऑक्टोबरला बंद करत आहोत. मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळाने मृत झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली आहे.”

“उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला मोकळं सोडतंय”

“भाजप भारतातील शेतकऱ्यांप्रती क्रुरतेने वागत आहे. भाजप आणि त्यांची सत्ता असलेली राज्यं देशातील विविध भागात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चिरडण्याचं काम करत आहे. याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या झालेल्या घटनेचा निषेध करणं, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला बेमुर्वतखोरपणे मोकळं सोडतंय. त्याचाही निषेध आवश्यक आहे. म्हणून ११ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या वतीने हा बंद पुकारत आहोत,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

VIDEO: लखीमपूरला जाणाऱ्या भाजपा माजी खासदाराचे केस ओढले, धक्के मारत पोलीस गाडीत घातलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र बंद कसा असणार?

जयंत पाटील यांनी यावेळी बंदचं स्वरुपही स्पष्ट केलं. ते म्हणाले, “या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल. आघाडीच्या वतीने हा निर्णय हा घोषित करण्यात येतोय. हा बंद सरकार म्हणून नसेल. मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने या बंदची घोषणा करत आहोत. पक्षाच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतोय.”