जन सुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करु नये यासाठी मविआच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भेटीचं कारण सांगितलं. जन सुरक्षा विधेयक विरोधकांना विश्वासात न घेता मंजूर केलं गेलं, असं विधान त्यांनी केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “आज राज्यपालांची भेट घेऊन जनसुरक्षा विधेयकासंदर्भात पत्र दिलं. ज्या पद्धतीने आम्हाला विश्वासात न घेता, बोलू न देता ते विधेयक मंजूर केलं गेलं. आमचे त्यावर काही आक्षेप होते, काही गोष्टी आम्हाला सुचवायच्या होत्या त्यासंदर्भातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही, विचारलं नाही. त्या विधेयकात प्रावधान केलं नव्हतं. या राज्यातील सरकारचे अपयश लपवण्यासाठी आणि सरकारविरोधात बोलतो त्याला दाबण्यासाठी या विधेयकाचा वापर होईल.”

“अनेक कायदे आहेत, ते असतानाही या विधेयकाची काय गरज होती? हे जनसुरक्षा विधेयक नाही तर सरकार सुरक्षा विधेयक आहे. डावी विचारसरणी, उजवी विचारसरणीसाठी जर हे विधेयक असेल तर उद्या या राज्यात ज्यांनी अतिरेकी कृत्ये केली, कुठल्या देशविरोधी कृत्ये केली तर विचारसरणीच्या आधारे कारवाई होणार का. कारण अतिरेकी हा अतिरेकी असतो. तो डावा असो की उजवा असो या संदर्भातील स्पष्ट भूमिका आम्ही राज्यपालांकडे मांडली आहे. हे विधेयक म्हणजे सामान्य माणूस आणि संविधानाच्या अधिकारावर घाला आहे असे आम्ही राज्यपालांना सांगितले आहे. म्हणून हे विधेयक वापस पाठवावे, त्यांचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर – वडेट्टीवार

“विधानभवनात जी हाणामारीची घटना घडली त्यावरही राज्यपालांशी चर्चा झाली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे. आरोपी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या मागेपुढे फिरताना दिसून येत आहे. आताचे पुण्यात एका गुंडाने पोलीस ठाण्यात राडा केला. देशात नव्हे तर जगभरात या घटनेमुळे प्रतिमा मलिन झाली आहे. जे गुंड आणून हल्ले घडवले जातात यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आम्ही राष्ट्रपती राजवट बद्दल कोणतीही मागणी केली नाही. कायदा सुव्यवस्था सुधारावी यावर आम्ही चर्चा केली,” असं विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला, याबाबत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केला त्यांचा काय दोष आहे. मकोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला विधिमंडळ परिसरात प्रवेश मिळतो कसा? पडळकरांनी इशारा केला आणि यांनी नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्यावरही हल्ला करायचा होता.आव्हाडांवर गुन्हा दाखल होत असेल तर हे कायद्याचे राज्य राहिले नाही. सरकारच्या मर्जीने चालणारे राज्य झाले आहे. कायदा, संविधान न जुमानता सत्तेची गुर्मी यातून दिसत आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.