सर्वसामान्यांना शासनाकडून घेतलेल्या लोककल्याणकारी कार्यक्रमापासून वंचित ठेवण्याचे पाप लालफितीचा कारभार करीत असतो. या प्रशासन व्यवस्थेलाच पिचलेल्या सामान्य माणसासाठी आपली उमेदवारी असल्याचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाफिज धत्तुरे यांनी रविवारी सांगितले.
धत्तुरे म्हणाले, की शासन लोकांसाठी वेगवेगळय़ा योजना जाहीर करीत असते, मात्र या योजनांची अंमलबजावणी करीत असताना लालफितीच्या कारभाराकडून सामान्य जनतेची पिळवणूकच होत असते. छोटे व्यावसायिक, हातगाडी विक्रेते, फेरीवाले यांची समाजाला गरज असताना त्यांचे पुनर्वसन न करता व्यवस्थेतूनच हकालपट्टी करण्याचे कुटिल कारस्थान प्रशासन करीत असते. या धोरणाच्या विरोधात आपली उमेदवारी असल्याचे सांगत ते म्हणाले, की गुप्त मतदान, गुप्त प्रचार या पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा कार्यरत राहील. कोणताही डामडौल न करता आपण मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच कार्यकर्त्यांची बठक बोलावून प्रचार गतिमान करणार आहोत असेही ते म्हणाले.