महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे त्यांना लवकरच मदत दिली जाणार आहे असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांचाही मोठा वाटा आहे असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. शिर्डीमध्ये तीन दिवस महापशूधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. या एक्स्पोचं उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
देशपातळीवर सर्वात मोठ्या महापशूधन एक्स्पोचं आयोजन शिर्डी करण्यात आलं आहे. शेतीला जोड व्यवसाय असलेल्या पशूपालन, शेळी पालन, कुक्कुटपालन यासह हा महा एक्स्पो शिर्डीत सुरू झाला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
सुजय विखे पाटलांनी एक्स्पोचे केलेले नियोजन उल्लेखनीय असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. मी कृषी प्रदर्शन घेतलं, किती त्रास होतो मला माहित आहे असंही सत्तार यांनी यावेळी बोलून दाखवलं. “गलतीयाँ सबकी होती है दोस्त, किसकी छुप जाती है किसीकी छुपायी जाती है.” असा शेरही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसंच पुढे सत्तार म्हणाले की मी आज या ठिकाणी पोहोचलोय यात अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे.
मागच्या सरकारमध्ये माझ्यावर मोठं धर्मसंकट होतं. मी महसूल राज्यमंत्री होतो आणि ते होते कॅबिनेट मंत्री ( बाळासाहेब थोरात ). माझे नेते राधाकृष्ण विखे पाटील. यावेळी विखे पाटलांचे प्रेम कमी करा असा मला फोन यायचा. हा विषय उद्धव ठाकरेंपर्यंत देखील गेला होता असे सत्तार म्हणाले. मात्र विखे पाटलांनी आणि मी आमच्या दोस्तीत कधी फॉल्ट येऊ दिला नाही असेही ते म्हणाले. आता ओरिजनल शिवसेना-भाजपची युती सत्तेवर आली आहे असंही वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.