महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशात एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशाच्या मृत्यूप्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप शेवाळेंनी केला. यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली.

या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. “एका ३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असं विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी केलं होतं.

हेही वाचा- ‘हा निर्लज्जपणाचा कळस’, अब्दुल सत्तारांच्या माध्यमातून लक्ष्य करणाऱ्या अजित पवारांना CM शिंदेंचं उत्तर, म्हणाले “त्यांच्याही प्रकरणाची…”

आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला आदित्य ठाकरेंवर बोलण्याची काहीही गरज नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसैनिक आहोत. आदित्य ठाकरेपेक्षा माझ्या मुलाचं वय जास्त आहे,” असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “शरद पवारांकडे अनेक गुण शिकण्यासारखे”, गिरीश बापटांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सोमय्यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी चौकशी होऊ द्या की थेट फाशी लावणार- गुलाबराव पाटील

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी गायरान जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधीपक्ष सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते ठीक आहे. पण याची तुम्ही पहिली चौकशी करणार की नाही? की थेट फाशी लावणार… आधी चौकशी करा. चौकशीत तथ्य आढळलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यासाठी सरकारचं काम बंद पाडायचं आणि लोकांना मिळणारा न्याय मिळू द्यायचा नाही, ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही,” अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.